Wednesday, January 17, 2007

majhyaa kavitaa

YOu can view my poems here.

वेळ झाली पापण्यांनी पापण्यांशी बोलण्याची वेळ झाली
बोललो नाही कधी ते सांगण्याची वेळ झाली

जा सखे तू ,शब्द माझा मोडण्याची वेळ झाली
का हव्याशा बंधनाला तोडण्याची वेळ झाली?

वेळही झाला कितीसा डाव हा मांडून राया
एवढ्यातच हाय सारे हारण्याची वेळ झाली

सांजवेळी पाकळ्यांना मिटुन घ्या माझ्या फुलांनो
उमलले तुमच्यासवे ते विसरण्याची वेळ झाली

आसवांना वाहण्याची एकदा संधी मिळाली
तीच ती दु:खे नव्याने सोसण्याची वेळ झाली.

Sonali Joshi- Published ekata - July 06 -सोनाली जोशी

निळावतीच्या शुभ्रकळ्यांनो
निळावतीच्या, शुभ्रकळ्यांनो, अंधारा या,उजळाया
पानोपानी, बहरूनीया, ह्या विश्वाला, सजवाया
निघा सख्यांनो, लवकर साऱ्या,मला भेटण्या, प्रेमाने
शब्दांमध्ये, माझ्या फुलुनी, रहा कवितेत, स्नेहाने

पहाटपक्षी, साद घालता, दाटुनिया ये, किती मला
रात्रंदिन हा, लपाछपीचा, खेळ नकोसा, अता मला
साऱ्या हसऱ्या, ओठांवरती, जेव्हा असते, मम गाणे
आठवते मी, तेव्हा तेव्हा, सारे तुमचे, नजराणे!

निळावतीच्या, शुभ्रकळ्यांनो, घनतम सारे, प्रकाशले
धवल आपुल्या, अनुरागाने, तृप्तीलाही, सुखावले

published Rangadeep 06- sonali Joshi

No comments: